लहानपण
प्रतिभा पाटील यांच्या आईचे नाव गंगाबाई आणि वडिलांचे नाव नानासाहेब उर्फ नारायणराव होते. नानासाहेब हे जळगाव येथे सरकारी वकील होते. त्यांना पांच मुले व एक मुलगी होती. प्रतिभा यांचे बालपण जळगाव आणि चाळीसगाव येथे गेले. सुट्टीच्या काळात त्या आपल्या आजोळी नाडगांव येथेही जात असत त्यांच्या वयाच्या १० व्या वर्षीच त्यांच्या आईचा स्वर्गवास झाला. त्यानंतर त्यांची देखभाल त्यांच्या सर्व भावंडांची मावशी बासाहेब यांच्या निगराणीखाली झाली. बासाहेब यांनी सर्व चालीरीती विशेष करून त्यांचेवर योग्य संस्कार केले आणि परंपरा यांचे पालन उत्तम प्रकारे मुलांकडून व्हायला हवे यावर भर दिला. त्याचा उत्तम परिणाम प्रतिभा यांच्यावर झाला. कणखर इच्छाशक्ति, नात्यांतील आपुलकी, व्यवहारांतील वैचारिक शिस्त त्यामुळे बाणविली गेली. एकदा ८-९ वर्षाच्या असतांना त्या व त्यांची मैत्रीण कक्कू शाळेत बरोबर जात असतांना पाऊस येत होता पण खूपच जोरात पाऊस आला व एक नाला पार करीत असतांना त्यांचे दोघीचे पाय जमिनीवरून सुटले व त्या दोघी वाहवत निघाल्या परंतु एक माणूस कोणीतरी आला व त्याने त्या दोघींना बाहेर काढले त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
शिक्षण
नानासाहेबांनी आपल्या मुलीला भरपूर शिक्षण देण्याचे वचन आपल्या पत्नीला दिले होते. त्यांनी तो शब्द कटाक्षाने पाळला. प्रतिभा या राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांत M A झाल्या. १९६२ साली महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या आमदार असतांना त्यांनी आपल्या पित्याच्या इच्छेखातर कायद्याची पदवी घेतली. त्याचा पुढे त्यांना त्यांच्या कार्यात फार फायदा झाला. त्यांच्या या व्यापक शैक्षणिक अनुभवांमुळे त्यांना राज्य स्तरांवर अनेक विभागांचे मंत्रीपदही मिळाले. सतत वीस वर्षे त्यांनी निरनिराळ्या विभागाचे मंत्रीपद, तसेच केंद्रीय पातळीवरही अनेक घटनात्मक पदे भुषविली.
महाविद्यालयातील आपले शिक्षण पूर्ण करत असताना खेळातही रस घेतला. विशेष म्हणजे त्यांनी टेबल-टेनिसमध्ये इंटर कॉलेजिएट स्पर्धामधे विजेतेपद मिळविले होते.
राजकीय प्रवासाचा प्रारंभ
प्रतिभाने आपले पहिले भाषण चाळीसगांव येथील राजपुत समाजाच्या मेळाव्याप्रसंगी केल. समाजातील ज्येष्ठ व्यक्ती त्यांच्या विचाराने प्रभावित झाल्या. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण उपस्थित होते. उच्च शिक्षित तरुणींनी आपल्या ज्ञानाचा लाभ राजकारणात प्रवेश करून घ्यावा असे आपले धोरण असल्याचे मा. चव्हाण यांनी नमूद केले. त्यानुसार उच्च विद्या-विभूषित आणि उत्तम संवाद कौशल्य असणाऱ्या प्रतिभा पाटील यांना जळगाव मतदारसंघातून येथून १९६२ साली विधानसभेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाने तिकीट दिले. राजकारणातील त्यांच्या या पदार्पणाच्या निवडणुकीत त्यांनी आपल्या तीन ज्येष्ठ आणि जाणत्या अनुभवी विरोधकांचा पराभव केला. १९६२ ते १९८५ या कालावधीत त्यांनी पाच वेळा विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या. १९८५ साली राज्यसभेचे सदस्यत्व. निवडणुकीत त्या कधी हरल्या नाहीत.
कुटुंब
त्यांचा विवाह १९६५ साली डॉ. देवीसिंह शेखावत ह्यांच्याशी झाला. देवीसिंह शेखावत हे कॉलेज मध्ये प्रोफेसर होते. इतकेच नव्हे तर सामाजिक आणि राजकीय कार्यात त्यांना रस होता. १९८५ त १९९० या काळात ते अमरावती मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व केले होते. १९९२ साली नव्याने स्थापन झालेल्या अमरावती महानगरपालिकेच्या प्रथम महापौरपदाचा बहुमानही त्यांना मिळाला. शैक्षणिक क्षेत्रातीलही त्यांची कामगिरी भरीव आहे. नागपूर विद्यापीठात – सिनेटचे सभासद होते, स्पोर्ट कमिटी चेअरमन असतांना – शिवाजी पुरस्कार शासनातर्फ़े मिळाला. अमरावती विद्यापीठाच्या सिनेटचे सभासद होते आणि काही काळ विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु म्हणूनही काम केले. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक समितीचे सभासद म्हणून काम करताना त्यांनी रसायनशास्त्र विषयाचा अभ्यास क्रम तयार केला. त्याचबरोबर त्यांनी या विषयांवर तज्ञ म्हणून माध्यमिक शालेय स्तरांवरची पुस्तकेही आपल्या सहकाऱ्यासमवेत लिहिली. त्यांनी आपल्या पत्नीला तिच्या राजकीय प्रवासात भक्कम साथ दिली. त्यांना दोन मुले आहेत. त्यापैकी राजेंद्र (रावसाहेब) यांनी आपल्या माता-पित्यांच्या पाऊलावर पाऊल टाकले आहे. ते आमदार होते. कन्या ज्योती या अभियांत्रिकी पदवीधर आहेत, पुणे येथे एक नामांकित शाळा चालवितात.