भारतीय लष्काराच्या सरसेनापती
राष्ट्रपतीपदाच्या अधिकारांबरोबरच ताई या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला सरसेनापती बनल्या. आपल्या कार्यकाळात त्यांनी दुर्गम अशा लष्कराच्या छावण्यांना भेटी दिल्या. ते करत असलेल्या अलौकिक राष्ट्रीय कार्याबद्दल सैन्यदलांना प्रोत्साहन दिले. त्यांचे प्रश्न समजून घेतले. त्यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी सुखोई ३० या भारतीय हवाई दलाच्या फायटर विमानातून त्या वयात अवकाश भरारी हा आयुष्यातील महत्त्वाचा क्षण होता. १९६२ साली चीनचे आक्रमण झाले. सारा देश या आक्रमणामुळे हादरला. प्रसंगाचे गांभीर्य जाणून ताईंनी आपल्या मतदारसंघाचा झंझावाती दौरा करून जखमी सैनिकांच्यासाठी कल्याण निधी मोठ्या प्रमाणात जमा करण्यासाठी भावनात्मक आवाहन केले. ताई तरुण आमदार होत्या. त्यांच्या या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. काही स्त्रीयांनी आपले दागदागिने या राष्ट्रकार्यासाठी दिले. ताईंंनी संरक्षण सेवांना हातभार लावण्यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये ‘जिल्हा महिला गृहरक्षक दल’ स्थापन केले. या संदर्भात आवश्यक असलेल्या सर्व चाचण्यांत ताई उत्तीर्ण झाल्या. त्या या गृहरक्षक दलाच्या कमांडरपदी नियुक्तही झाल्या. ३०३ बंदुकीच्या व निशाणेबाजीच्या झालेल्या स्पर्धेत त्यांना दुसरा क्रमांक मिळाला. त्यांना भारतीय सैन्यदलाबाबत प्रचंड आस्था होती आणि सैन्यदलासंबंधी असलेल्या आदराचे प्रतीक म्हणून त्यांनी या सरसेनापतीपदाची सूत्रे राष्ट्रपतीपदी असताना घेतली.
सैन्य दलाच्या छावणींना भेटी
आपल्या कार्यकिर्दीत त्यांनी अतिदुर्गम असणा-या सैनिकी छावण्यांना भेट देऊन आपल्या सैन्याचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला. जम्मु-काश्मिरच्या दूरवरच्या सीमाभागात जाऊन सैनिकांची भेट घेतली. त्याचबरोबर अरुणाचल प्रदेशातील इंडो-तिबेटन-बॉर्डर–पोलिसांशीही त्यानी संवाद साधला. हवाईदल आणि नौदल ( विमानवाहू युद्ध नौका विक्रांत ) तळांनाही त्यांनी भेटी दिल्या.
सार्वजनिक उद्योगातील संरक्षण संस्था आणि रक्षा संशोधन आणि विकास संघटनाना भेटी
आपल्या कार्यकाळात त्यांनी संरक्षण दलाशी संबंधित अनेक कारखान्यांना भेटी दिल्या. यामध्ये प्रामुख्याने भारत इलेक्ट्रॉनिक्स लि., हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि., संरक्षण संशोधन विकास संघटना आणि संरक्षण संबंधित साहित्य निर्माण करणारे कारखाने यांचा समावेश होता. अशाच एका कारखान्याच्या युनिट ची स्थापना त्यांनी अमरावती येथे करून घेतील. आपल्या या भेटीत त्यांनी असे संशोधन आणि साहित्य भारतात निर्माण करणा-या आणि क्षेपणास्त्र विकसित करणा-या वैज्ञानिकांना प्रोत्साहन दिले.
सैन्य दलाच्या कार्यक्रमाना उपस्थिती
आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीत त्यांनी सैन्यदलाच्या विविध कार्यक्रमांना भेटी दिल्या.
- राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि भारतीय लष्कर अकादमी यांच्या दीक्षांत समारंभ, सैनिक संम्मेलनाला, हुतात्मा मानवंदना आदि कार्यक्रमांना उपस्थिती.
- शौर्य पदक प्रदान समारंभ आणि सैनिक गौरव समारंभ.
- सैन्य दलाच्या एकत्रित स्ट्राईक कवायतीच्या कार्यक्रमांना उपस्थिती.
- नौदलाच्या कामाचे अवलोकन.
सुखोई ३० या फायटर विमानातून उड्डाणाचा अनुभव
भारतीय हवाई दलाच्या सुखोई ३० या लढाऊ विमानातून उड्डाणाचा अनुभव जी. आय सूट घालून २५ नोव्हेंबर २००९ रोजी घेतला. या लढाऊ विमानातील त्यांचा प्रवास हा ज्या महिलांना अशा धाडसी लढाऊ दलात काम करण्याची इच्छा आहे अशा महिलांसाठी प्रेरणादायक आणि स्फूर्ती देणारा अनुभव होता. तसेच आपल्या जवानांचे नीतीधैर्य वाढविण्यासाठी सुद्धा होता. रशियाचे अध्यक्ष दिमिगी मिदवेदेव्ह यांनी ताईंच्या धाडसी कार्याबद्दल फोन करून ताईंचे अभिनंदन केले.
सद्भावना प्रयोग
सैन्यदलाने आपल्या सद्भावना प्रयोगाअंतर्गत आणि जम्मू-काश्मिरच्या दुर्गम भागत अनेक सदिच्छ शाळा सुरु केल्या. अत्यंत रास्त आणि परवडणा-या फीमध्ये गरिब मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे हा त्यामागचा मुख्य हेतू होता. हे विद्यर्थी ज्यावेळेस दिल्लीला सहलीसाठी येत तेव्हा ताई त्यांची व्यवस्था चांगल्याप्रकारे होईल याकडे जातीने लक्ष देत असत. आपल्या कामातून वेळ काढून त्या या मुलांशी संवादही साधत.
सैन्यदल कुटुंब कल्याण कार्यक्रम
भारताच्या राष्ट्रपती असल्याने ताई अनेक कल्याणकारी संस्थेशी संबंधित होत्या. सैन्यदल पत्नी कल्याणकारी संघटना (आर्मी वाईव्हज वेल्फेअर असोसिएशन) आणि हवाईदल पत्नी कल्याणकारी संघटना यांच्या कार्याशी त्यांचा निकटचा संबंध होता.
स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार
प्रतिवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या एक आठवडा आगोदर स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार ताईंच्या हस्ते राष्ट्रपती भवनात केला जात असे. त्यांना मानसन्मान देत त्यांच्याशी चर्चा करुन त्यांची गा-हाणी ऐकली जात असत. मुख्यतः त्यांची गा-हाणी ही पेन्शन अथवा वैद्यकिय उपचारासंबंधी असत. ती त्वरीत सोडविण्यासाठी ताई संबंधित सरकारी खात्यांशी संपर्क साधत आणि तो प्रश्न सुटला आहे याची खात्री करुन घेत असत.
राष्ट्रपतींचे संरक्षक दल
अत्यंत दक्ष आणि उत्तम गुणवत्ता असलेले सैन्यदलाचे अश्व दल हे राष्ट्रपतींचे संरक्षक दलाच्या सेवेत असत. त्यांचे महत्वाचे काम हे राष्ट्रपतींच्या सदा समवेत राहणे आणि त्यांचे संरक्षण करणे होय. आपल्या कार्यकाळात त्यांनी या दलाच्या ‘गार्ड चेन्जिंग सेरेमनी’ हा जनतेसाठी खुला केला.