‘भारतामध्ये प्राचीन काळापासून शिक्षणाला महत्व दिले गेले आहे. शिक्षण हे आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळांत चांगल्या राष्ट्रनिर्मितीसाठी सर्व स्तरांवर उत्तम शैक्षणिक सुविधा पुरविणे ही आपली प्राथमिकता बनली आहे. आता शास्त्र आणि तंत्रज्ञानाला आपल्या शैक्षणिक पध्दतीत अधिक महत्व दिले गेले पाहिजे. त्यामुळे आपल्या भारताला माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राबरोबर इतर ज्ञानाधिष्ठित क्षेत्रामध्येही जागतिक स्तरांवर नेतृत्व करण्याची संधी मिळू शकेल. त्यासाठी आम्ही अधिकाधिक शैक्षणिक सुविधांवर भर देण्यासाठी आग्रही आहोत. प्राथमिक शिक्षण हा आम्ही मुलभूत हक्कामध्ये समाविष्ट केला आहे. माध्यमिक आणि इतर संबंधित शिक्षण सर्वत्र पसरावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. – ( ‘मॉरिशस विद्यापीठात २०११ साली दिलेले भाषण’ )
प्राथमिक शिक्षण पध्दती
‘शाश्वत विकासासाठी महिलांची आर्थिक साक्षरता आणि समावेशन’ या विषयांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना ताई म्हणाल्या, ‘सध्याच्या ज्ञानाधिष्ठित समाजामध्ये शिक्षणाचे आपल्या प्रगतीमध्ये महत्वाचे योगदान आहे. शिक्षणक्षेत्रातील उणीवा या आपल्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करू शकतात. देशाची शैक्षणिक गरज सर्वार्थाने भागविण्यासाठी शैक्षणिक प्रगतीला प्राधान्य देण्यात आले आहे. देशांत सर्व स्तरांवर साक्षरतेचा प्रसार व्हावा यासाठी योजना कार्यान्वित केल्या जात आहेत.’ आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात ‘सर्व शिक्षा अभियान’ कार्यक्रमाचा हिरीरीने पुरस्कार केला. या सर्व शिक्षा अभियानांतर्गत ६ ते १४ वर्षाच्या मुलांना शिक्षण मोफत आणि अनिवार्य केले.
महिला साक्षरता
स्त्रीयांना साक्षर करणे ही आजची खरी गरज आहे. त्यांच्यामध्ये साक्षरतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढवून आणि त्यांना देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासांत सहभागी करून घेतले पाहिजे. स्त्रीया या जर साक्षर बनल्या तर त्या स्वयंनिर्भर बनतील आणि त्यांचा समाजाच्या बहुविध विकासासाठी उपकारक होईल. असं म्हटलं जात की, एका मुलाला शिकविले तर एका व्यक्तिला शिकविले जाईल, पण एका मुलीला शिकविले तर तिचे कुटुंब प्रशिक्षित होण्यास मदत होईल. स्त्रियांना लिहायला, वाचायला शिकविले तर त्या आपल्या मुलींना शिकविण्यासाठी शाळेला अवश्य पाठवतील. यासाठी समाजातील लिंगभेद मिटविण्याची खरी गरज आहे. कारण तोच त्यांच्या शिक्षणामध्ये अडथळे निर्माण करतो. त्यासाठी त्यांनी स्वत:हून शिक्षणाच्या संधीचा फायदा अवश्य घेतला पाहिजे, तरच त्या सक्षम बनू शकतील. त्यांना ही संधी मिळवून दिली तर त्या या संधीचे सोने करतील. त्यामुळे शिक्षण घेताना त्यांना आवश्यक त्या ज्ञानाबरोबरच, कौशल्य प्राप्त करण्याची संधीही मिळवून दिली पाहिजे. – (‘शाश्वत विकासासाठी महिलांची आर्थिक साक्षरता आणि समावेशन’ दिल्ली येथे ८ सप्टेंबर २०११ रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेतील त्यांचे भाषण)
विद्यापीठीय शिक्षण
‘भारताच्या सामाजिक-आर्थिक विकासांमध्ये ज्ञानाधिष्ठित आणि तंत्रज्ञानयुक्त शिक्षणाचा प्रसार करणे ही विद्यापीठांची मुलभूत भूमिका असली पाहिजे. आपल्या तरुणांना भविष्यकाळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी योग्य प्रकारे तयार करणे आणि जगातील सातत्याने बदलत असणाऱ्या आणि विस्तारणाऱ्या संधीचा फायदा घेण्यासाठी त्याना सक्षम बनविले पाहिजे. त्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणामध्ये परिस्थितीचे योग्य विश्लेषण करणे , वैचारिक क्षमता निर्माण करणे आणि कुठल्याही प्रकारची अढी न ठेवता सर्वांशी नम्रपणे वागले पाहिजे. आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये आपला वाटा समर्थपणे उचलला पाहिजे. मानवतेच्या कल्याणासाठी आणि आपली पृथ्वी भावी पिढ्यांच्या दृष्टीने सुरक्षित राहावी यासाठी आपले सकारात्मक प्रयत्न असले पाहिजेत.’ (चिली विद्यापीठाने तार्इंना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. त्याप्रसंगी ताईंनी व्यक्त केलेले विचार). मानवाची प्रगती, अज्ञानापासून मुक्तता आणि समस्त मानवकल्याणाच्या हिताच्या काम करण्यासाठी तार्इंनी शिक्षणाचा पुरस्कार केला. शिक्षणामुळे अज्ञानाचा अंधकार दूर होतो, प्रगती होते आणि मिळालेल्या ज्ञानाचा वापर आपल्याला विनाशांपासून वाचवितो. भारताची आर्थिक प्रगती, राजकीय जागृती तसेच सामाजिक-सांस्कृतिक जाणीवा प्रगल्भ होत जातात. भारताला जागतिक व्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावता येईल; आणि हे सर्व शक्य आहे ते केवळ शैक्षणिक क्षेत्रात आपण करत असलेल्या प्रगतीमुळे! इतर विकसनशील देशांनी भारताबरोबर एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे. यासाठी अशा देशांनी आपल्याला या शैक्षणिक कार्यात येणाऱ्या अनुभवासह सहयोग दिला पाहिजे.
शैक्षणिक जागतिक भागीदारी
समाजांत सकारात्मक बदल घडविण्याची ताकद शिक्षणात आहे. यामुळे जागतिक स्तरांवर सर्वांनी एकत्रित येऊन परस्पर सहकार्याच्या भावनेने काम करावे. विविध देशांनी आपली कौशल्ये, तंत्र आणि धोरणे यांचा एकत्रित येऊन काम केले तर त्यामधून त्या त्या देशांत नवीन कौशल्याचा अवलंब केल्याने प्रेरणात्मक परिणाम निर्माण होईल, तार्इंचा प्रबळ विश्वास होता की, अशा प्रकारे विविध देशांतील सहकार्याची भावना शिक्षणक्षेत्रामध्ये नवीन परिमाण निर्माण होऊ शकेल. शिक्षणाची गरज ही केवळ एखाद्या देशाच्या वैविध्यतेमध्ये भर टाकू शकेल असे नाही तर त्याचा व्यापक असा जागतिक परिणामही होऊ शकेल. आज आपण आपल्या देशाच्या सीमा इतपतच मर्यादित राहिलो नसून शिक्षणक्षेत्रातील विविधतेमुळे आपला तरुण हा जागतिक वैविध्याच्या जवळ गेला आहे. हे केवळ शिक्षणामुळे शक्य झाले आहे.
भारतीय शिक्षण व्यवस्था