राष्ट्रपतींच्या हेल्पलाईनचा शुभारंभ
तार्इंच्या कार्याची जमेची मोठी बाजू म्हणजे त्यांचा जनतेशी सातत्याने असलेला संपर्क होय. राष्ट्रपती भवनात रोज मोठ्या संख्येने जनतेची गाऱ्हाणी आणि तक्रारी येत असत. त्यांच्या पूर्वीच्या कारकीर्दीतही अशा प्रकारचे विनंती अर्ज हाताळले जात होते. त्याचा विशेष परिणामही होत नसे, कारण त्याच्या हाताळणीसाठी खूप वेळ जात असल्याचे तार्इंच्या लक्षात आले. या अर्जांचा आणि तक्रारींचा तत्परतेने निपटारा होण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा आग्रह त्यानी धरला. राष्ट्रपती भवनात डिजिटल पोर्टल सुरू करण्यासाठी त्यांनी आदेश दिले. ती कार्यपध्दती अंमलात आणण्यासाठी त्यानी मार्गदर्शनही केले. हे पोर्टल २४ जून २००९ रोजी कार्यान्वित झाले. जनतेला आपल्या तक्रारी आणि गाऱ्हाण्यांचा त्वरित निपटारा होण्यासाठी हे पोर्टल अत्यंत उपयुक्त ठरले.


नीलायम बाग जनतेसाठी खुली
हैद्राबाद येथील नीलायम बाग हे राष्ट्रपतींसाठी एक निवास्थान आहे. ही बाग अत्यंत सुस्थितीत ठेवलेली नव्हती. ताईंनी त्यात सुधारणा घडवून आणल्या व येथे वनौषधींची बागही सुरू केली. ही बाग आणि इतर बागाही जनतेच्या भेटीसाठी वर्षातील काही काळ खुल्या ठेवण्यात आल्या. या बागा जनतेला पाहण्यासाठी खुल्या ठेवल्याने जनतेने त्यांच्या या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले. या बागेला हजारोंच्या संख्येने जनता भेट देत असते.
राष्ट्रपती भवनही जनतेसाठी खुले
राष्ट्रपती भवनातील रक्षक बदल समारंभ (चेन्ज ऑफ गार्ड) हा परंपरागत अंतर्गत कार्यक्रम होत असे. तार्इंच्या राष्ट्रपतीपदाच्या काळात हा समारंभ अधिक आकर्षक व्हावा आणि जनतेला त्या कार्यक्रमाला हजर राहता यावे यासाठी आवश्यक ते बदल त्यांनी सुचविले. हा समारंभ आता प्रत्येक शनिवारी आयोजित केला जातो. प्रेक्षकांना या निमित्त राष्ट्रपती भवनाच्या मध्यवर्ती परिसरांत प्रवेश दिला जातो. हा कार्यक्रम आता पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे.


राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात फेरफटका
राष्ट्रपती भवनाचा भव्य परिसर हा अनेक प्रकारच्या वनस्पतींनी युक्त आहे. या भवनाच्या जवळ असलेला ७५ एकरांतील नैसर्गिक परिसर हा जनतेसाठी खुला नव्हता. हा परिसर घनदाट जंगल, तलाव आदि नैसर्गिक पर्यावरणपूरक साधनसामग्रीने समृध्द होता. हा परिसरही जनतेसाठी खुला केला. या परिसरांत फिरताना पर्यटकांना राष्ट्रपती भवनाच्या आसपास फिरण्याची संधी प्राप्त झाली आहे.
दुर्मिळ वस्तू पाहण्याची अभ्यागतांना संधी
तार्इंनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या काळांत दुर्मिळ वस्तू संग्रहालय भवनाच्या स्वागतकक्ष दालनाजवळ जनतेसाठी खुले केले. पर्यटकांच्या सोयीसाठी हे संग्रहालय आता मुगल गार्डनजवळ हलविले. राष्ट्रपतींना मिळालेल्या भेटी आणि स्मरणिका पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.


राष्ट्रपती भवनाच्या पोस्ट तिकीटाचे अनावरण
राष्ट्रपती भवनाच्या इमारतीला ८० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तार्इंच्या हस्ते पोस्टाच्या खास तिकीटाचे अनावरण करण्यात आले. ब्रिटीश-इंडियाच्या गव्हर्नर जनरलनी तत्कालिन राजधानी कोलकत्याहून दिल्लीला हलविण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्यासाठी राष्ट्रपती भवनाची ही वास्तू १९११ साली बांधण्यात आली होती.