भारतीय व्यवसायाला जागतिक कोंदण
परदेशी भेटी – सिंहावलोकन
राष्ट्रपतीपदांवर असताना तार्इंनी राष्ट्राचे हित जपण्यासाठी आणि द्विस्तरीय संबंध सुधारण्यासाठी परदेशांना भेटी दिल्या. यात प्रामुख्याने जी-5 (रशिया, चीन आणि युके)चा समावेश होता. याबरोबरच उपखंडातील लॅटिन अमेरिका (ब्राझिल, मेक्सिको आणि चिली) यांच्यासमवेत पहिल्यांदाच व्यवसायवाढीच्या दृष्टीने प्रयत्न केले गेले. तसेच वसाहतवाद आणि वर्णद्वेषाविरुध्द लढा देणाऱ्या अफ्रिकेचा (मॉरिशस, सेशेल्स आणि दक्षिण अफ्रिका) दौराही त्यांनी केला. सार्कच्या विकासातील सहभाग (भूतान आणि ताजिकीस्थानच्या) भेटीत भारताची मध्य-आशियातील महत्त्वाची भूमिका विशद केली. पूर्व आणि दक्षिण आशिया (लाओस, कंबोडिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, दक्षिण कोरिया आणि मंगोलिया) यांना भेट देताना भारताचे त्यांच्याबाबत असलेली सौहार्दाची भूमिका त्यांनी आपल्या भेटीत विषद केली .
युरोप (सायप्रस, स्पेन, पोलंड, ऑस्ट्रिया आणि स्विझरलंड , यु.केसह) हे देश भारताचे चांगले व्यापारी प्रतिनिधी आहेत, त्याचबरोबर गल्फ आणि पश्चिम आशिया (युनायटेड अरब एमिरात आणि सिरीया) या ठिकाणी परदेशस्थ भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. येथे शांतता आणि स्थैर्यासाठी भारताने बजावलेली कामगिरी मोेलाची मानली गेली आहे.
इतर देशांच्या प्रमुखांची भारताला भेट
भारताच्या सातत्याने वाढत्या प्रगतीबरोबरच भारताला इतर देशांशी समन्वय राखून सुसंवाद राखणे आवश्यक बनले आहे. भारताच्या परदेश धोरणातील सातत्य – द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या महत्वाच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी भारताने अनेक देशाच्या आणि शासकीय प्रमुखांना आमंत्रित करून त्यांच्याशी विधायक स्वरूपाच्या चर्चा केल्या आहेत. विविध देशांना भेटी देणे असो अथवा त्या देशांच्या प्रतिनिधींना भारतभेटीसाठी आमंत्रित करून त्यांच्याशी चर्चा केल्याने भारता विषयीच्या सदिच्छेत भरच पडली आहे. यामध्ये प्रामुख्याने असोसिएशन ऑफ साऊथइस्ट एशियन नेशन्स, सार्क, इस्ट एशिया समिट, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ बिझनेस अप्रेझर्स यांचा उल्लेख करता येईल.
तार्इंच्या राष्ट्रपतीपदाच्या काळात ज्या महत्वाच्या नेत्यांनी राष्ट्रपती भवनाला भेट दिली त्यामध्ये जी-५ राष्ट्रांचे प्रमुख (अमेरिका, फ्रान्स, रशिया, यु.के. आणि जर्मनी), ब्रिक्स(ब्राझिल, दक्षिण अफ्रिका), सार्क देश (श्रीलंका, नेपाळ, भुतान आणि बांगलादेश), एसियन, अफ्रिका, युरोप, मध्यपूर्व आणि मध्य आशियातील देशांचा समावेश होतो.
व्यापारी प्रतिनिधी
आपल्या परदेशी भेटीत भारताचा व्यवसाय वृध्दिंगत होण्यासाठी तार्इंनी प्राथमिकता दिली. यासाठी त्यांनी इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्सच्या प्रतिनिधींना आपल्या समवेत नेले. ज्या देशाला भेट द्यायची असेल तेथील प्रमुख उद्योग-व्यवसाय याची संपूर्ण माहिती घेऊन त्यांच्याबरोबर झालेल्या व्यावसायिक चर्चेचा, आपल्या देशाला व्यावसायिक संधी कशी मिळू शकेल याचा प्रामुख्याने विचार केला जात असे. संबंधित देशाला भेट देताना तेथील भारतीय व्यावसायिक आणि उद्योजक यांचा त्या देशातील बाजारपेठेचा अनुभव आणि प्रतिक्रिया जाणून घेण्यास त्या उत्सुक असत. त्यांना काही अडचणी आहेत का? असल्यास त्या समाधानकारक रीत्या कशा सोडविता येतील याबाबतही विचारविनिमय केला जात असे. यासंबंधीचे प्रश्न तातडीने सुटावेत यासाठी त्या त्या देशातील सरकार व राष्ट्रप्रमुखांची व भारतीय व त्या देशातील उद्योग व व्यापारी संघटनांची जॉईंट मीटिंग बोलवीत व त्यात चर्चा होई. त्यामुळे त्या देशातील आपल्याला येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होत गेली. यामुळे भारतीय व्यावसायिक आणि संबंधित देश यांचे सौहार्दाचे संबंध राहिले.
राष्ट्रपतीपदांवर असताना त्यांनी १३ वेळा परदेशी दौरे केले. २४ देशांना भेटी दिल्या. आपल्या या परदेश भेटीत सुरूवातीच्या वेळी या शिष्टमंडळात १८-२० प्रतिनिधी होते पण नंतर; या प्रतिनिधींची संख्या ५५-६० वर गेली. या २४ देशांच्या दौऱ्यामध्ये ४९२ व्यापारी प्रतिनिधींनी भाग घेतला. या भेटीमुळे व्यापारी समजोत्याचे अनेक प्रस्ताव आणि करारांवर सह्या झाल्या. राष्ट्रपतींच्या या परदेशी दौऱ्यांने आपल्या प्रतिनिधींच्या त्या देशांच्या प्रतिनिधींबरोबर समक्ष चर्चा होऊ शकल्या. त्यामुळे अडचणी दूर झाल्या, गैरसमज दूर झाले. परकीय बाजारपेठेंच्या नेमक्या गरजेबाबत माहिती झाली. आपल्या तसेच भेट दिलेल्या देशाचे या समक्ष संपर्कामुळे व्यापारी संबंध सुधारण्यास मोठी मदत झाली आणि आर्थिक विकासाची आणि प्रगतीची वाट मोकळी झाली.
तार्इंनी घेतलेल्या पुढाकारांमुळे एएसएसओसीएचएएम(असोसिएटेड चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया), सीआयआय(कॉनफेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) आणि एफआयसीसीआय(फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री) या भारतातील प्रमुख व्यापारी संघटनांना आपल्या प्रतिनिधींची निरनिराळया देशांना भेट देण्याची संधी मिळाली. या तीन व्यापारी संघटनांनी आपल्या या भेटीमुळे निष्पन्न झालेल्या फायद्यांबद्दल ‘जागतिक गुंतवणूक’ नामक एक ग्रंथ प्रसिध्द केला. त्यांनी संयुक्तिकरीत्या तो ग्रंथ १८ जून २०१२ रोजी समारंभपूर्वक तार्इंना दिला. या प्रसंगी एएसएसओसीएचएएमचे महासचिव डी. एस. रावत म्हणाले की, तार्इंनी आपल्या परदेशीभेटीसाठी व्यापारी आणि उद्योगजगतातील प्रतिनिधींना आपल्यासमवेत नेल्यामुळे प्रतिनिधींना उच्च स्तरांवर चर्चा करणे सोयीचे बनले. या प्रसंगी तार्इंनी दिलेल्या अनमोल सहकार्याबद्दल सीआयआयचे महासचिव चंद्रजित बॅनर्जी म्हणाले की, तार्इंच्या दूरदृष्टीबद्दल आणि व्यावसायिकांना आपल्याबरोबर या दौऱ्यांसाठी नेऊन असामान्य योजकतेचा प्रत्यय दिला. जागतिक अर्थव्यवस्थेत भारताची व्यावसायिक भूमिका अधिक चांगल्या प्रकारे उच्च स्तरांवर प्रकट झाली. एफआयसीसीआयचे महासचिव डॉ. राजीव कुमार म्हणाले, ‘या ग्रंथाद्वारे आम्ही या पाच वर्षांत भारतीय उद्योग-व्यापारांने जे यश संपादन केले आहे त्याचा गोषवारा आहे. तार्इंनी या संदर्भात केलेली मदत अमूल्य आहे. त्यामुळे आम्ही हे यश प्राप्त करू शकलो.