ग्रामीण सुधारणांना प्रोत्साहन
तार्इंना ग्रामीण भागातील जनता नवनवे उपक्रम राबवित असते, पण त्यांना योग्य अशा व्यासपीठाची गरज असते की, जेणेकरून ते आपले उत्पादन सर्वांच्या नजरेंस चांगल्या प्रकारे आणू शकतील. त्यांचे उत्पादन हे केवळ ग्रामीण स्तरांवर आणि स्थानिक पातळीवर राहू नये यासाठी तार्इंनी अशा व्यक्तींना प्रोत्साहन देणे ही आपली प्राथमिकता मानली. राष्ट्रपती भवनातील मोघल गार्डन हे जनतेसाठी खुले झाले. ‘नॅशनल इनोव्हेशन फॉऊन्डेशन’च्या माध्यमातून २०१० सालापासून तेथे ग्रामीण भागातील जनतेने तयार केलेल्या नवनवीन उपक्रमांचे प्रदर्शन भरविले जाते. अशा प्रकारचे अनोखे प्रदर्शन भरविण्याचा आणि ग्रामीण भागातील जनतेला प्रोत्साहित करण्याचा बहुमान राष्ट्रप्रमुख या नात्याने तार्इंच्याकडे जातो. त्यांनी प्रेरित केलेल्या या उपक्रमामुळे २०१० नंतरचे दशक हे उपक्रमांचे दशक म्हणून ओळखले जाईल अशी घोषणाही याप्रसंगी करण्यात आली. नॅशनल इनोव्हेशन फॉऊन्डेशनचे प्रमुख ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांनी तार्इंच्या या उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. या उपक्रमांमुळे त्यांना उद्योजकांचा पाठिंबा मिळेल आणि त्यांच्या उत्पादनाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त होईल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
तार्इंनी सिंचनाच्या सोयीसाठी कमी खर्चात उपयुक्त असे उपकरण करण्याचा प्रयत्न करा असे नॅशनल इनोवेशन फौंडेशनला सांगितले तेव्हा फौंडेशनने हरियाना आणि मध्यप्रदेश येथील काही उपक्रमशील उद्योजकांना सांगितले व त्यांनी हातपंप, फवारा मारण्याचा पंप आणि सिंचनासाठी स्वयंचलित मशिनची निर्मिती केली. यासाठी छोट्या मोटारीवर चालणारे १०५ हॉर्स-पॉवरचे इंजिन आणि त्यावर पाण्याची टाकी असे त्याचे स्वरूप होते. या यंत्राचे प्रात्यक्षिक राष्ट्रपती भवनात त्यांनी पाहणी केली व आपले उत्पन्न वाढविण्यास छोट्या शेतकऱ्यांला त्याचा उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.